- संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, मनोज सेठीया यांच्या नावांची चर्चा…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे हे महत्त्वाचे पद रिक्त झाले आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर महापालिकेत शहर अभियंतापदासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून या पदावर कोणाची निवड होणार? याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प, विविध बांधकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचे तांत्रिक नियोजन व अंमलबजावणी पाहण्याची जबाबदारी शहर अभियंत्यावर असते. त्यामुळे हे पद महापालिकेतील अत्यंत प्रभावी आणि जबाबदारीचे मानले जाते. सामान्यतः स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन शहर अभियंतापदी नियुक्त केले जाते.
सध्या सहशहर अभियंता पदावर कार्यरत असलेले मनोज सेठिया हे सेवाज्येष्ठ असल्यामुळे ते या पदासाठी पात्र मानले जात आहेत. मात्र, महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून काम पाहणारे संजय कुलकर्णी आणि प्रमोद ओंभासे हे दोघेही शहर अभियंता पदासाठी इच्छुक असल्याने स्पर्धा अधिकच रंगली आहे.
महापालिकेत काही वर्षांपूर्वी शहर अभियंतापदाच्या समकक्ष मुख्य अभियंता हे पद निर्माण करण्यात आले होते. या पदावरही सहशहर अभियंत्यांनाच पदोन्नती दिली जाते. त्यामुळे मुख्य अभियंत्यांना शहर अभियंता पदावर संधी देण्याचा निर्णय घेतल्यास महापालिकेच्या आकृतीबंधात बदल करण्याची आवश्यकता भासू शकते. सध्या प्रशासन पातळीवर या संदर्भात विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अखेर शहर अभियंतापदी कोणाची निवड होते आणि त्यासाठी प्रशासन कोणता मार्ग स्वीकारते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.












