- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रशासनाकडे विनंती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज थेट प्रक्षेपित (लाईव्ह) करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाला पत्र देऊन त्यांनी नागरिकांच्या हितासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलण्याची विनंती केली आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जाणारी महानगरपालिका आहे. शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामांवरील चर्चा आणि करदात्या नागरिकांच्या पैशांचे नियोजन महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केले जाते. त्यामुळे या सभेचे कामकाज नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींचे कामकाज आणि सभागृहातील चर्चेची माहिती थेट पाहण्याची इच्छा असते. प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये सभेचे कामकाज लाईव्ह करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने ही सुविधा सुरू करणे प्रशासनासाठी सहज शक्य असल्याचेही भोईर यांनी सांगितले.
आगामी सर्वसाधारण सभेपासून महानगरपालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.












