- मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनर खरेदीची घाई…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्याचा गंभीर आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केला होता. रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत “येथे बॉम्ब आढळला तर जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला होता.
पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर किंवा बॅग तपासणीसाठी स्कॅनिंग मशीन नसल्याची धक्कादायक बाब उघडकिस आली होती. या प्रकरणानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
महानगरपालिकेच्या अणुविद्युत व दूरसंचार विभागाने बॅग स्कॅनर मशीन, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टर खरेदीसाठी दरपत्रक मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह विविध कार्यालये, रुग्णालये, नाट्यगृह आणि इतर इमारतींच्या प्रवेशद्वारांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपकरणांची गरज असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२२-२३ च्या दरसूचीत या साहित्यांचा समावेश नसल्याने स्वतंत्र दरनिर्धारण करावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
त्यासाठी अशा प्रकारचे कामकाज किंवा पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून अंदाजपत्रकीय दर मिळवण्यासाठी दि. २४ फेब्रुवारी २०२६ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत ई-कोटेशनद्वारे ऑनलाईन दरपत्रक मागविण्यात आले होते. त्याची मुदत आता संपली आहे. दरपत्रकांची छाननी केल्यानंतर त्यासाठी टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.












