- सूक्ष्म व लघुउद्योगांना कर्ज, औद्योगिक क्लस्टर आणि स्टार्टअपसाठी महाफंडची घोषणा स्वागतार्ह…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०६ मार्च २०२६) :- महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणांचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेले उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ हे राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे बेलसरे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्लस्टर उभारण्याची योजना राज्याच्या आर्थिक विकासाला गती देईल. २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नात उद्योग क्षेत्राचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि प्रत्येक जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्याची घोषणा उद्योगांसाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूक्ष्म व लघुउद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या घोषणेचेही त्यांनी स्वागत केले. मात्र बँका व वित्तीय संस्थांकडून उद्योगांना सहज कर्ज मिळेल याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाल्यास या क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होईल आणि उद्योगांची वार्षिक उलाढाल वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच स्टार्टअपसाठी महाफंड निर्माण करून त्यांना वित्तीय कर्जपुरवठा सुलभ केल्यास नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास बेलसरे यांनी व्यक्त केला.
एकूणच उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन पुरवठा साखळीतील सूक्ष्म व लघुउद्योगांनाही त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.












