न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०६ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रशासकराज असल्याने गेल्या चार वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार करत आहेत. अनेक वर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेले कर्मचारी मस्तवाल झाले असून त्यांची बदली करणे आवश्यक आहे. असाच एक प्रकार शिक्षण विभागातील लिपिक सोयल मुलानी यांच्याबाबतीत समोर आला आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी आग्रही मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर रवी लांडगे यांना भेटून निवेदन दिले आहे.
महापालिकेत एकाच ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत महापौर यांनी आदेश दिले आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मुलाणी सोयल महेबुब हे लिपिक या पदावर काम करत आहेत. त्यांच्याकडे खासगी शाळा आस्थापना तसेच खासगी शाळांबाबत न्यायालयीन कामकाज पाहणे अशी जबाबदारी आहे. गतवर्षी २०२५ मध्ये त्यांची कर संकलन विभागामध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबाव आणत त्यांनी ही बदली रोखली. त्यांच्याबाबत सर्वसामान्य पालक तसेच काही खासगी शाळा प्रशासनाच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच एकाच विभागात एकाच टेबलवर ते वर्षांनुवर्षे काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे खासगी शाळांच्या प्रशासनाशी लागेबांधे तयार झाले असून त्याचा फटका सर्वसामान्य पालकांना बसत आहे. त्यामुळे सोयल मुलाणी यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.












