- नगरसेविका कुंदाताई भिसे यांनी घेतली आयुक्तांची भेट..
- नियोजित जागेचा भाडेकरार अनं इतर सोयी-सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- पिंपळे सौदागर परिसराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी भारतीय डाक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे भारतीय डाक विभागाने पिंपळे सौदागर येथे नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळ पोस्ट ऑफिस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीची सिटी सर्व्हे क्रमांक ११३, ११६ व ११७ मधील मारुती मंदिर सांस्कृतिक भवन अंतर्गत हॉल ही जागा देण्याबाबत महानगरपालिकेने तत्त्वतः सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. भारतीय डाक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी करून ती पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी योग्य असल्याचेही नमूद केले आहे.
तथापि, सदर जागेबाबत भाडेकराराची नोंदणी आणि काही आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. विशेषतः त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृहाची व्यवस्था, प्रवेशद्वारावर शटर बसवणे, खिडक्यांची दुरुस्ती तसेच अंतर्गत व बाह्य रंगकाम आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी नगरसेविका डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सांगितले की, चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आ. शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची महत्त्वाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेनेही या विषयाला प्राधान्य देत भाडेकरार प्रक्रिया आणि आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून पोस्ट ऑफिस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिसची सुविधा मिळावी यासाठी प्रभाग क्रमांक २८ मधील नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे या स्थानिक नगरसेवकांसह चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यावेळी कुंदाताई भिसे यांनी सांगितले.












