न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणी जन्मनियंत्रण (ABC) अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत असून त्यांच्यामार्फत श्वान पकडणे, त्यांची नसबंदी करणे आणि उपचारानंतर पुन्हा त्याच परिसरात सोडणे ही प्रक्रिया नियमितपणे राबवली जात आहे.
या वाहनांचा उपयोग जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठीही केला जात आहे. त्यामुळे प्राणी कल्याणासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्राण्यांशी संवेदनशीलतेने वागावे यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी काही संभाव्य जागांची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून त्याबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपायुक्त खोत यांनी दिली. शहरातील भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.












