- शहर सुधारणा समितीच्या बैठकीत स्वच्छता, पर्यावरण व झोपडपट्टी भागातील सुविधांवर चर्चा..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर विकासाची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार असल्याची माहिती शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात शहर सुधारणा समितीची बैठक सभापती काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शहर विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर-लोंढे, वैशाली काळभोर, अर्चना सस्ते, नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, कचरा संकलन व व्यवस्थापनावर भर देणे तसेच उद्योग-व्यापार परवानग्या सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला गती देणे, झोपडपट्टी भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि नद्यांच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्याबाबतही निर्देश देण्यात आले.












