न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व इतर खासदारांनी संसदेच्या ‘मकर प्रवेशद्वारा’चा वापर ‘पिकनिक स्पॉट’प्रमाणे केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने मोरवाडी येथे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
लोकसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे किंवा आंदोलन करण्यास मनाई असताना काँग्रेसने नियमांचे उल्लंघन करून संसदेच्या शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला.
यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याचा वापर प्रसिद्धीसाठी किंवा पिकनिकसाठी करणे हा सर्वोच्च सभागृहाचा अवमान आहे.”
या आंदोलनात संजय पटनी, नितीन काळजे, सचिन तापकीर, मंदार देशपांडे, अमित गावडे, आरती चोंधे, सुजाता पालांडे, दिनेश यादव यांसह भाजपचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















