- जांभे ग्रामपंचायतीच्या पाठीमागील ठिकाणावर अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :- खायच्या पानात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये अमली पदार्थांचे मिश्रण करून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जांभे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असलेल्या एका ठिकाणावर अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (१५ मार्च) दुपारी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून कैलास दत्तात्रय मांढरे आणि महिला आरोपी (दोघे रा. आकुर्डी) यांना अटक केली आहे.
नेमकी कारवाई अशी…
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गोदामामध्ये अमली पदार्थ मिश्रित पावडर, उग्र वास असलेला काळा पातळ पदार्थ आणि वेगवेगळ्या मशीन साठवून ठेवल्या होत्या. हे पदार्थ खायच्या पानात टाकून खाण्यासाठी वापरले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून मालासह एक चारचाकी गाडी आणि ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
उत्तर प्रदेशातील कनेक्शन…
अटकेतील आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी हा माल कनोज (उत्तर प्रदेश) येथील रितेश गुप्ता याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस शिपाई मितेश यादव यांनी फिर्याद दिली असून, सपोनि साळु या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








