- पिंपरीतील दिव्यांग भवन फाउंडेशनला भेट देत कामकाजाचा घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी व्हावे यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग भवन फाउंडेशनला त्यांनी भेट देत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान महापौर लांडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती, प्रशिक्षण विभाग आणि विविध सेवा-सुविधांची पाहणी केली. फिजिओथेरपी, समुपदेशन, विशेष प्रशिक्षण तसेच पुनर्वसनाशी संबंधित उपक्रमांविषयी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अधिक प्रभावी व दर्जेदार पद्धतीने विस्तार व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.












