न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या १०० फुटी पुतळा व स्मारक प्रकल्पातील वाढीव सुमारे ५० कोटी रुपयांच्या सिव्हिल व इलेक्ट्रिक कामाला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनात या कामासाठी मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेल्या ठेक्याबाबत तसेच प्रकल्पाच्या खर्चात झालेल्या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे ६५ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच स्थायी समितीत मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती देऊन फेरनिविदा काढावी आणि संपूर्ण प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भव्य व दर्जेदार व्हावा, मात्र काम पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने व्हावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.














