- दररोज दोन तासांच्या ‘शटडाऊन’मध्ये काम; २१ मार्चपर्यंत सात गर्डर बसविण्याचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- केंद्रीय रेल्वे विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर मागील वर्षभर रखडलेल्या पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. लोहमार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या मध्यभागी लोखंडी गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले असून रविवारी दोन गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आले. उर्वरित पाच गर्डर पुढील काही दिवसांत दररोज दोन याप्रमाणे बसविण्यात येणार आहेत.
पिंपरी गावठाण व बाजार परिसरातून पुणे–मुंबई महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना डेअरी फार्ममार्गे रेल्वे फाटक ओलांडावे लागते. मात्र सिग्नलमुळे अनेकदा १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला.
पुलाच्या रुळांच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वेमार्गावरील मध्यभागी काम करण्यासाठी रेल्वेची परवानगी आवश्यक होती. गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार असल्याने ही परवानगी मिळण्यास जवळपास वर्षभर विलंब झाला.
महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने दररोज दोन तासांचा ‘शटडाऊन’ देण्यास मान्यता दिली. या मर्यादित वेळेत गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २१ मार्चपर्यंत सातही गर्डर बसवून त्यानंतर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होणार असून एप्रिल अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पिंपरी गावठाण आणि कॅम्प परिसरातून जाणाऱ्या वाहनांना रेल्वे फाटकावरील प्रतीक्षेचा त्रास टळणार असून काही मिनिटांत पुणे–मुंबई महामार्गावर पोहोचणे शक्य होणार आहे.
पुलाची वैशिष्ट्ये :
एकूण लांबी : ४८५ मीटर
रुंदी : १७.२० मीटर
अंदाजित खर्च : ६५ कोटी २८ लाख रुपये
“लोहमार्गावरील पुलाच्या भागात गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले असून पहिल्या दिवशी दोन गर्डर बसविण्यात आले आहेत. २१ मार्चपर्यंत सातही गर्डर बसविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर स्लॅबचे काम सुरू होईल आणि एप्रिल अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण केले जाईल.”
— विजय भोजणे, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.














