- दुसऱ्या सोमवारी ५१ नागरिकांनी नोंदविल्या तक्रारी व सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे थेट निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम ९ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत दर सोमवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पोलीस आयुक्तांची थेट भेट घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवारी (१६ मार्च) झालेल्या दुसऱ्या भेटीत एकूण ५१ नागरिकांनी सहभाग घेत आपापल्या तक्रारी व सूचना मांडल्या. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
मागील सोमवारी या उपक्रमात ७६ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.














