- ओटीपीशिवाय सिलिंडर नाही..
- वितरकांना ९६ तासांत घरपोच सेवा बंधनकारक…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ मार्च २०२६) :- घरगुती गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, गॅस सिलिंडर देताना ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून, बुकिंगनंतर चार दिवसांच्या आत (९६ तासांत) सिलिंडर घरपोच पोहोचवणे आवश्यक राहणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तेल कंपन्या आणि गॅस एजन्सींना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या निर्णयामुळे अनधिकृत वितरणावर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ग्राहकांनी एजन्सी किंवा गोदामावर जाऊन थेट सिलिंडर घेण्याची पद्धत पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. सर्व वितरण अधिकृत बुकिंग आणि ओटीपी पडताळणीनंतरच केले जाणार आहे. तसेच प्रत्येक एजन्सीला त्यांच्या कार्यालयाबाहेर स्पष्ट सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून या बदलांची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. “एजन्सीसमोर अनावश्यक गर्दी करू नये” असा संदेश देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांना वेळेत सेवा मिळेल आणि वितरणातील गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.








