- उत्पन्नवाढीवर भर; जुन्या देण्यांसाठी मोठा निधी राखीव…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर करताना महसूल वाढ आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बैठकीत सुमारे ४०० कोटींहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात बहुतांश निधी आधीच्या देणी आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी राखून ठेवण्यात आला असून, नवीन कामांसाठी मर्यादित तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बांधकाम परवाने, जाहिरात फलक (आकाशचिन्ह), कर वसुली आणि पाणीपट्टी यामधून महसूल वाढवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जाहिरात फलकांसाठी नव्या नियमावलीत बदल करत दररचनेत सुधारणा केली जाणार असून, त्यातून अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित आहे.
याशिवाय, पालिकेच्या मालकीच्या जागा व भूखंड भाड्याने देताना दररचनेत बदल करून अधिक महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थापन, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन आणि महिलांसाठी कौशल्यविकास उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे.
पवना प्रकल्पांसाठी स्वतंत्र निधी राखण्यात आला असून, सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. तसेच नगरसेवकांसाठी विकास निधीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. विविध लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अर्थसंकल्पात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या ठेवी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असल्यास सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने निधी वापरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.















