न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील विविध विभागांची सखोल पाहणी केली. प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान त्यांनी प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी व त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामातील अडचणी आणि तांत्रिक गरजांची माहिती घेतली. विभागांमधील समन्वय वाढवून कामकाज अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले.
कार्यालयीन स्वच्छता, सुव्यवस्था आणि कागदविरहित कामकाजावर विशेष भर देत अनावश्यक कागदपत्रे हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून शिस्तबद्ध कामकाज करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील १५ दिवसांत पुन्हा पाहणी करून सूचनांची अंमलबजावणी तपासली जाणार असून लवकरच क्षेत्रीय कार्यालयांचीदेखील पाहणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.














