न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- सिंगल यूज प्लास्टिकचा वाढता वापर रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून ब क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १७ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत प्लास्टिक वापर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व थुंकणे या प्रकारांवर एकूण २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईदरम्यान ५ हजार रुपयांची ३ प्रकरणे, २ हजार रुपयांचे १ प्रकरण, १ हजार रुपयांची ४ प्रकरणे आणि ५०० रुपयांचे १ प्रकरण नोंदविण्यात आले.
सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक रुपाली साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छता नियमांचे पालन करावे, अन्यथा यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.














