न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धावडेवस्ती येथे ‘वेस्ट टू आर्ट’ या अभिनव उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. “स्वच्छ सर्वेक्षण २०२६” आणि “माझी वसुंधरा ६.०” अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे, नगरसदस्या राजश्री लांडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती तयार करत सुशोभीकरण करण्यात आले.
महापौरांनी नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करत पुनर्वापराच्या संकल्पनेवर भर दिला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेतली. ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम शहरभर राबविण्याचा मानस व्यक्त करत स्वच्छ, सुंदर शहरासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले.
















