- पवनानगर आणि काळेवाडीतील उद्यानाच्या आरक्षणाचं रूपांतरण आता निवासी क्षेत्रात?..
- सर्वसाधारण सभेतील विविध उपसूचनांमुळे बदल प्रस्तावित…
संतोष जराड, प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० मार्च २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या विविध उपसूचनांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चिंचवड येथील सिटी सेंटरसाठी राखीव जागेवर अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा प्रस्ताव विशेष चर्चेचा विषय ठरला.
प्रभाग क्रमांक 10 मधील मोकळ्या जागेमध्ये अॅटो क्लस्टर समोरील भुखंडावर क्रीडा विद्यापीठ उभारण्याची उपसूचना सभेत मंजूर करण्यात आली. या विद्यापीठाला ‘अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ’ असं नाव देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
प्रस्तावाला नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी सूचक तर, कुशाग्र कदम यांनी अनुमोदन दिले आहे.
दरम्यान सायन्स पार्कसमोरील आणि महापालिकेच्या नव्या इमारतीजवळील याच जागेवर व्यापारी सिटी सेंटर उभारण्याची योजना दरवर्षी अंदाजपत्रकात मांडली जात होती. आता याच जागेवर क्रीडा विद्यापीठ उभारले जाऊ शकते. त्यामुळे वादग्रस्त सिटी सेंटर उभारणीला तिलांजली दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय, सांगवी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचा वापर वाढवण्यासाठी सांगवी परिसरातील अंतर्गत रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसृष्टी उद्यान परिसरात १८ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यास मान्यता देण्यात आली.
पवनानगर आणि काळेवाडी येथील काही सर्व्हे क्रमांकांवरील उद्यानाचे आरक्षण रद्द करून ते निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची उपसूचनाही मंजूर झाली. तसेच, निगडी-प्राधिकरण येथील यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेतील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासह काही प्रशासकीय निर्णयांनाही मंजुरी देण्यात आली. पिंपळे गुरव येथील रस्ते विकासासाठी जमीनमालकांना नुकसानभरपाई देण्याचाही निर्णय झाला.
तसेच, दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्गाचे सुशोभीकरण, महात्मा फुले उड्डाणपूलावर रोषणाई, तसेच विविध ठिकाणांच्या नामांतरासंबंधी प्रस्तावांना सभेत हिरवा कंदील देण्यात आला. सभागृहातील कामकाज पारदर्शक करण्यासाठी लाईव्ह चित्रीकरणाची सुविधाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.














