- तातडीने बंदोबस्त करा; मारुती जाधव यांची आयुक्तांकडे मागणी…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. 20 मार्च 2026) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली परिसरातील घरकुल, पूर्णानगर, कृष्णानगर, शरदनगर, फुलेनगर व इतर भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, परिसरातील वृद्ध महिला-पुरुष, तसेच शालेय विद्यार्थी यांना भटक्या कुत्र्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक ठरत आहे. विशेषतः एमआयडीसी परिसरातून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या कामगारांना कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे व हल्ल्याच्या भीतीमुळे तणावाखाली प्रवास करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अलीकडेच चाकण परिसरात घडलेल्या महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा उल्लेख करत प्रशासनाने तरी यानंतर जागे होणार का, असा सवालही करण्यात आला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर संबंधित भागातील नागरिक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.














