- PMPML बस कंत्राट प्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात; दोषींवर कठोर कारवाई करा – आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात वेधले सरकारचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ मार्च २०२६) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कार्यपद्धतीवर आणि सीएनजी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आमदार अमित गोरखे यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधानपरिषदेत त्यांनी या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदीवर सरकारचे लक्ष वेधले.
आमदार अमित गोरखे यांची भूमिका…
पीएमपीएमएलच्या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. नियमानुसार सुरक्षा ठेव म्हणून ‘बँक गॅरंटी’ स्वीकारणे अपेक्षित असताना, केवळ ‘चेक’ स्वीकारण्यामागील नेमकी तांत्रिक बाजू काय आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे गरजेचे आहे. तसेच, सीएनजी बस खरेदीचा करार ज्या वेगाने पूर्ण झाला, त्यामागे नेमकी प्रशासकीय निकड काय होती, यावरही प्रशासनाने प्रकाश टाकावा. एकाच कंत्राटदाराला सातत्याने मोठी कामे मिळणे, हे त्या कंत्राटदाराच्या कार्यक्षमतेचे निदर्शक असू शकते, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत नियमांचे पालन झाले आहे का, याची सखोल शहानिशा होणे जनहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती समोर आणावी, अशी आग्रही मागणी आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात केली आहे.
मंत्री उदय सामंत यांचे उत्तर…
या विषयावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगत, तत्कालीन सीएमडी देवरे यांची बदली झाल्याचा उल्लेख केला. मात्र, केवळ बदलीने ही जबाबदारी संपत नाही. या निविदा प्रक्रियेला मान्यता कोणाकोणी दिली, त्यामागील तारखांचा मेळ काय आणि चेक स्वीकारण्याचा निर्णय कोणत्या अधिकार्याने घेतला, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
आमदार अमित गोरखे यांनी या संपूर्ण प्रकरणात पुराव्यानिशी चौकशीची मागणी केली आहे. जनतेच्या हितासाठी आणि पारदर्शकतेसाठी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.








