- नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
- सुहास कुदळे यांची चौकशी व कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील महावितरणच्या विविध उपविभागांमध्ये सुरू असलेल्या विद्युत कामांमध्ये गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी केला आहे. खराळवाडी, बिजलीनगर, सांगवी, हिंजवडी आदी भागांत सुरू असलेल्या कामांदरम्यान सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागवली असता संबंधित विभागांकडून अपूर्ण व असमाधानकारक माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष पाहणीत केबल जॉईंट व इतर विद्युत कामांदरम्यान सुरक्षा उपायांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी अधिकृत अधिकाऱ्यांची उपस्थिती नसून कामगारांकडे हेल्मेट, सेफ्टी शूज यांसारखी आवश्यक साधने नसल्याचे आढळले.
तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर केवळ कागदोपत्री पूर्तता दाखवून प्रत्यक्ष तपासणी टाळली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत कुदळे यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित सर्व कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
आम्ही आमच काम प्रामाणिकपणे करतो. कामगारांची काळजीही घेतली जाते. व्होल्टेज लेवलनुसार अधिकारी कर्मचारी कामाच्या ठिकाणी असतात. छोटे ब्रेकडाऊन असेल तर एजन्सीकडून काम करून घेतले जाते. सुरक्षा प्रणालीचा अवलंब कामाच्या ठिकाणी केला जातो.
– सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता – महावितरण…















