- अहिंसा सप्ताह, रॅली, पदयात्रा व सामाजिक उपक्रमांचा समावेश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.२४ मार्च २०२६) :- भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात यावर्षीही विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत “अहिंसा सप्ताह” साजरा करण्यात येणार असून, या दरम्यान सुमारे ४० पेक्षा अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने पिंपरीतील आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, स्वागताध्यक्ष किरणभाई शहा, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गादिया, उपाध्यक्ष शांतीनाथ पाटील, श्रेणिक मंडलेचा, मंत्री वीरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, सहकोषाध्यक्ष तुषार मुथा, प्रसिद्धी प्रमुख संदेश गदिया, धीरज नहार तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन, उमेश पाटील यांनी केले आहे.
दरम्यान अहिंसा सप्ताहाची सुरुवात दि. २५ मार्च रोजी कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात सकाळी ८.०० वाजता भक्तामर पठणाने होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहेत कार्यक्रम…
- दि. २६ मार्च रोजी स्वानंद महिला संस्थेच्या वतीने बिजलीनगर येथे पाणपोई उद्घाटन तसेच जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरण यांच्या वतीने गौतम प्रसादी भवन उद्घाटन व अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत.
- दि. २७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले उद्यान, विशाल नगर, पिंपळे निलख येथे वृक्षारोपण करून तीर्थंकर वाटिकेचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच आकुर्डी येथील जैन धर्मस्थानकात प्रश्नमंजुषा व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
- दि. २८ मार्च रोजी दापोडी येथे आनंद चालीसा, वायसीएम रुग्णालयात “आनंद की रोटी” उपक्रम, तसेच पिंपळे सौदागर येथे चित्रकला स्पर्धा, निगडीतील दिगंबर जैन मंदिरात पाककला स्पर्धा व उद्योगनगर येथील तेरापंथी भवनात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
- दि. २९ मार्च रोजी विविध ठिकाणी रक्तदान, नेत्रचिकित्सा, दंत व कर्करोग तपासणी शिबिरे, औषध वाटप, आयुर्वेदिक शिबिर, भक्तीगीत स्पर्धा, खाऊ व फळवाटप, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच धान्य वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- दि. ३० मार्च रोजी भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर, निगडी येथे नेत्रदान नोंदणी, रक्तदान व कर्करोग तपासणी शिबिर होणार आहे.
- दि. ३१ मार्च रोजी भगवान महावीर जयंती निमित्त विविध ठिकाणी रक्तदान, नेत्र व दंत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथून अहिंसा रॅलीला सुरुवात होणार असून, विविध प्रमुख मार्गांवरून ती पार्श्वनाथ चौक, बिजलीनगर येथे पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता अहिंसा पदयात्रा निघून ग.दि. माडगूळकर सभागृह, निगडी येथे समारोप होणार आहे. येथे सायंकाळी भक्ती संध्या, मेहुलभाई रुपडा (जालना) यांचे सादरीकरण व अहिंसा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
















