- विवेक मल्हारी तापकीर यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.२४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती पातळीवर निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्यामुळे गंभीर सार्वजनिक आरोग्य धोका निर्माण होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे.
घराघरांत वापरल्या जाणाऱ्या इन्सुलिन सिरिंज, इंजेक्शनच्या सुया आणि मुदत संपलेली औषधे थेट कचऱ्यात टाकली जात असल्याने सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांना ‘नीडल स्टिक इंज्युरी’चा धोका वाढला आहे. यामुळे हिपॅटायटीस-बी, सी आणि एचआयव्हीसारख्या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, औषधांमुळे जलप्रदूषण आणि भटक्या जनावरांनाही गंभीर धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील औषधालयांमध्ये ‘मेडिसिन ड्रॉप बॉक्स’ बसवून कचऱ्याचे सुरक्षित संकलन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महानगरपालिकेने नियमित संकलन करून शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीही सहकार्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.














