- उत्पन्नवाढीवर भर; पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा व प्रभागनिहाय विकासाला चालना देण्याचा सत्ताधाऱ्यांकडून दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ९३२२.१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये ४१४.२२ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. स्थायी समितीमार्फत मंगळवारी (दि.२४) हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात आला होता. त्यास महापौर रवी लांडगे यांनी मंजुरी दिली.
स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जुन्या कामांसाठी १३०० कोटी, तर नवीन कामांसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बांधकाम परवानगी विभागातून २५८ कोटींची वाढ अपेक्षित आहे. तसेच मालमत्ता करातून ५० कोटी, होर्डिंग परवान्यांतून ३४ कोटी, पाणीपट्टीतून २० कोटी आणि इतर स्रोतांमधूनही उत्पन्न वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातील ३२ प्रभागांमध्ये सुमारे ११०० नवीन विकासकामांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी १९६.९० कोटींची तरतूद आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील तातडीच्या कामांसाठी १० लाख रुपयांचा स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी एकूण १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. पवना धरणातून निगडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याचा १०० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, यंदा त्यासाठी ४० कोटींची तरतूद आहे. सध्या शहराला ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होत असून, गळती रोखणे आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
वाहतूक सुधारणा आणि शहर विकासासाठी चौक सिग्नलमुक्त करण्याचे नियोजन, ‘पे अँड पार्क’ धोरण, बीआरटी कॉरिडॉरमधून ४० कोटींची वाढ, तसेच उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.
प्रभागस्तरीय लहान पण तातडीच्या कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्था, पदपथ सुधारणा यांसारखी कामे जलदगतीने पूर्ण केली जाणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात भटक्या श्वानांसाठी निवारागृहे, महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र, सीबीएससी दर्जाचे डिजिटल स्कूल, रतन टाटा म्युझियम गॅलरी, ‘अजितसृष्टी’ स्मारक, आरोग्य हेल्पलाइन, सोलर प्रकल्प, पवना रिव्हर फ्रंट, मलनिस्सारण सुधारणा, ईव्ही चार्जिंग स्टेशन, सॅनिटरी नॅपकिन मशीन, कलाकार व कामगार कट्टा, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या विविध प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.












