- सांगवीतील रस्ते विकास व भूसंपादनासह काळेवाडीतील पवनानगर आरक्षण रद्दची उपसुचना मंजूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत नगरसेवक विनोद नढे यांनी काळेवाडी पवनानगर परिसरातील सर्वे क्रमांक ८८, ९०, ९१, ९५ व ९६ येथील आरक्षण क्र. ६३९ हे उद्यानासाठी राखीव असून, ते रद्द करून सदर जागा निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी उपसुचनेदरे केली होती. त्यास सभेत महापौर रवि लांडगे यांनी मंजुरी दिली.
दरम्यान सांगवी परिसरातील रस्ते विकास व भूसंपादनासंदर्भात देखील नगरसेवक विनोद नढे यांनी महत्त्वाची उपसूचना सादर केली होती. मुळा नदीवरील नव्याने उभारलेल्या सांगवी-बोपोडी पुलाचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी जोडरस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली होती
सदर उपसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सांगवी येथील सर्वे नंबर ६ मधील शिवसृष्टीसमोरील तसेच आसपासच्या भागातील पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशेतील १२ मीटर रुंद रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. हे रस्ते १८ मीटर रुंद मुख्य रस्त्याशी जोडले जाणार असल्याने वाहतूक सुलभ होणार आहे.
तसेच सांगवीतील सर्वे नंबर ३ व ४ हद्दीत उत्तर-दक्षिण दिशेने १२ मीटर रुंद रस्ता विकसित करण्याचीही गरज अधोरेखित करण्यात आली आहे. या सर्व रस्त्यांसाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम १२६ तसेच नवीन भूसंपादन कायदा २०१३ अंतर्गत संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठवून तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याची मागणी उपसुचनेनुसार करण्यात आली होती. त्यास देखील महापौर यांनी मंजुरी दिली आहे.












