- उच्च दाब वाहिनी तुटल्याने वीज पुरवठा खंडित..
- महावितरण त्या बांधकाम व्यवसायिकावर कारवाई करणार?…
अशोक लोखंडे : संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मार्च २०२६) :- रावेत, विकासनगर आणि किवळे भागात चिंचवड एक्स्टेन्शन परिसरातून वीजपुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी रावेतच्या म्हस्के वस्ती येथे सुरू असलेल्या बेफिकीर खोदकामात तुटली आणि संपूर्ण परिसर अक्षरशः अंधारात बुडाला. मंगळवार (२४) आणि बुधवार (२५) सलग दोन दिवस हजारो नागरिकांना विजे अभावी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उन्हाळ्याची कडक झळ आधीच जाणवत असताना वीज खंडित झाल्याने नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला. पंखे, कूलर बंद… घरात उकाड्याने असह्य परिस्थिती… त्यातच पाणीपुरवठाही कोलमडला. विजेअभावी मोटारी बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागली. महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला.
सर्वात मोठा फटका बसला तो विद्यार्थ्यांना. शाळा व स्पर्धा परीक्षांचा हंगाम सुरू असताना अचानक अंधार आणि उकाड्यात अभ्यास करणे कठीण बनले. अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोलमडले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच ही वेळ आली,” असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. योग्य परवानग्या, समन्वय आणि नियोजन केले असते, तर हजारो लोकांना हा त्रास सहन करावा लागला नसता, असे मत जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, महावितरणने तातडीने दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून तांत्रिक पथके युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगितले आहे. दरवेळी अशाच चुका आणि नंतर फक्त दुरुस्ती, हा खेळ कधी थांबणार? उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंड वीज व पाणीपुरवठा ही केवळ अपेक्षा नसून गरज आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आता कठोर आणि जबाबदार भूमिका घेणे अत्यावश्यक बनले आहे.
रावेत, किवळे, यासह माझ्या प्रभागात विज पुरवठा खंडित झाल्याच्या अनेक तक्रारी करणारे नागरिकांचे फोन येत होते. मी अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याचे सांगण्यात आले. देखभाल दुरुस्ती करणे अथवा नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
– राजेंद्र तरस, युवा सेना प्रमुख, मावळ लोकसभा…“चिंचवड एक्स्टेन्शन येथून रावेत, विकास नगर आणि किवळे या भागांना विद्युत पुरवठा करणारी उच्च दाब विद्युत वाहिनी म्हस्के वस्ती येथे बिल्डरकडून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान उचकटून निघाल्याने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सुरळीत आणि पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत ठोस कारणांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल.”
– किरण सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, निगडी कार्यालय














