- गॅस टंचाईमुळे गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये रस्त्यावरच तूतू-मैमै..
- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईला येईना वेग?…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मार्च २०२६) :- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन व गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याची झळ आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागली आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरात अवैध गॅस रिफिलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत दिघी, भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा तीन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. दिघी परिसरातील प्राईड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प येथे एका व्यक्तीकडून घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढून साठा केल्याचे उघड झाले. भोसरीतील भगत वस्ती परिसरातही अशाच प्रकारे मोठ्या सिलेंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरून विक्रीसाठी साठा केल्याची कारवाई करण्यात आली. सांगवीतील पिंपळे गुरव भागात तर अधिक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे आरोपीला प्रत्यक्ष गॅस रिफिलिंग करताना पोलिसांनी पकडले असून, मोठ्या प्रमाणात सिलेंडर व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींनी कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वालाग्राही गॅसची हाताळणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्फोट किंवा आगीसारख्या गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला होता. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत काही जण आर्थिक लाभासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीसांनी या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगून तपास आणि कारवाई तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणे अत्यावश्यक बनले आहे.








