- ‘दिव्यांग भवन’ला भेट देत कामकाजाचा आढावा; सेवा अधिक प्रभावी करण्याच्या सूचना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असून त्यांचे जीवन सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती Ranimai Ashok Pathare यांनी सांगितले.
महानगरपालिका संचलित ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ला समितीच्या वतीने सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका Shraddhatai Ravibhao Landge, समिती सदस्य, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी Paresh Gandhi यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध आरोग्य सेवा, उपचार पद्धती, पुनर्वसन सुविधा आणि प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी करण्यात आली. या सेवा अधिक प्रभावी व दर्जेदार करण्यावर सभापतींनी भर दिला. तसेच या सुविधांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवा विस्तार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महापालिका विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिव्यांगांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे. या भेटीमुळे ‘दिव्यांग भवन’च्या उपक्रमांना गती मिळणार असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.














