- ‘कलाकार कट्टा’ ठरणार कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ..
- भाऊसाहेब भोईर यांचे प्रतिपादन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २७ मार्च रोजी ‘जागतिक रंगभूमी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे नटराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच नाट्य परिषदेच्या कार्यालयात विधीवत पूजन करून रंगभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी उपस्थित नाट्यकर्मी व रसिकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सुहास जोशी, किरण येवलेकर, गौरी लोंढे, संतोष रासने, राजेंद्र बंग, मुकेश घोडके, पंकज चव्हाण, मनोज डाळींबकर, फिरोज मुजावर आणि जुबेर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भोईर यांनी ‘जागतिक रंगभूमी दिना’चा इतिहास सांगताना इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत १९६१-६२ पासून हा दिवस साजरा होत असल्याचे नमूद केले. नाटक हे केवळ मनोरंजन नसून समाजातील विचार आणि बदल प्रभावीपणे मांडणारे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कलाकार कट्टा’ या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे.
या कार्यक्रमानिमित्त शहरातील अनेक कलाकारांनी रंगभूमीवरील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले.
















