- वेस्ट टू एनर्जीपासून ‘शून्य कचरा’ उपक्रमापर्यंत शाश्वत व्यवस्थापनावर भर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०१ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी येथील विविध कचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देत कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यामध्ये वेस्ट टू एनर्जी, प्लास्टिक टू फ्युएल, बायोगॅस, बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा प्रक्रिया तसेच बायोमायनिंग प्रकल्पांचा समावेश होता. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात दररोज ७०० ते १,००० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे १४ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याचा ताण कमी होऊन महापालिकेच्या वीज खर्चात बचत होत आहे. भविष्यात २७ मेगावॅट क्षमतेचा विस्तार प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. यासोबतच प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती, सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस आणि C&D वेस्ट प्रक्रिया प्रकल्पांद्वारे एकात्मिक कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जात आहे.
दरम्यान, दापोडी व गवळी माथा परिसरातील ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचाही आयुक्तांनी आढावा घेतला. घरगुती कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण करून त्यापासून खतनिर्मिती केली जात असून, बचतगटातील महिलांमार्फत हा उपक्रम यशस्वीपणे चालवला जात आहे. या प्रकल्पात दररोज शेकडो घरांमधील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
आयुक्तांनी प्रकल्प अधिक सक्षम, पारदर्शक व शाश्वत करण्यासाठी विभागांमध्ये समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देण्याचे सांगितले. ‘शून्य कचरा’ संकल्पना शहरातील इतर भागांतही राबविण्याचे निर्देश देण्यात आले.














