- ७९ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, संघटीत गुन्हेगारीला मोठा आळा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करत १६ गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत ७९ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे.
या टोळ्यांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अंमली पदार्थ व्यवहार, वाहन चोरी, घरफोडी, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. आरोपींनी दहशत निर्माण करून अवैध आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सन २०२५ मध्येही पोलिसांनी ४५ टोळ्यांतील २२८ आरोपींवर मोका कारवाई केली होती. यंदाच्या कारवाईत सारंग आवड व बसवराज तेली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यास पोलिसांना यश मिळाले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.













