- अन्यथा आंदोलनाचा शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा आयुक्तांना इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी येथील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेत त्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन बंद करू, असा स्पष्ट इशारा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे राजेंद्र तरस उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,
“गेल्या काही दिवसांपासून किवळे, रावेत व मामुर्डी परिसरात अत्यंत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या भागातील नागरिकांना घरगुती वापर, शाळा, व्यावसायिक कामांसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
रावेत येथील पंपिंग स्टेशनला भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग १६ साठी किमान १८०० फ्लोने पाणीपुरवठा आवश्यक आहे. मात्र सध्या केवळ १६०० ते १६५० फ्लो पुरवठा होत असल्याने पाणी अनियमित व कमी दाबाने येत आहे. त्यामुळे तातडीने १८०० फ्लोने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच पुनावळे टाकीसाठी रावेतमधून होणारा पाणीपुरवठा थांबवून ताथवडे येथून पुरवठा सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.










