- एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर; आमदार अमित गोरखे ॲक्शन मोडमध्ये…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात बेफाम टिप्पर वाहतुकीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातांनी शहर हादरले आहे. बर्ड व्हॅली चौक येथे झालेल्या अपघातात एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन अपघातांत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर अमित गोरखे यांनी तातडीने पोलीस व महापालिका प्रशासनाशी संपर्क साधत कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बर्ड व्हॅली चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी, शाळेजवळ अशा घटना होणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भागात झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल व स्पीड ब्रेकरची कमतरता असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखून तातडीने ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जड वाहनांवर निर्बंध, शाळांजवळ सुरक्षा उपाययोजना आणि पोलिसांची विशेष गस्त वाढविण्याची मागणी त्यांनी केली. “केवळ सांत्वन नव्हे, तर ठोस उपाययोजना हाच आमचा प्राधान्यक्रम आहे,” असे आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले.










