न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :-पिंपळे गुरव परिसरातील एम. एस. काटे चौक ते माजी महापौर उषा ढोरे यांच्या निवासस्थाना दरम्यान, प्रतिभा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून एक मिनी ट्रॅव्हल बस बेवारस स्थितीत उभी आहे.
या बसवर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती साचली असून, बसच्या खालीही कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते.
तसेच नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बसचे एक चाक काढण्यात आल्याने ती हलविणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलिस वाहतूक विभागासमोरही ही बस स्थलांतरित करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या गंभीर समस्येकडे ना विद्यमान आमदारांनी लक्ष दिले आहे, ना संबंधित नगरसेवकांनी. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बेवारस बस हटवावी व परिसर स्वच्छ करावा. – प्रदीप गायकवाड, शहराध्यक्ष – शहर राष्ट्रवादी अर्बन सेल…










