- नियोजित शहर विकासासाठी महापालिकेचा मोठा निर्णय; रस्ता रुंदीकरणाला गती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वाकड–म्हातोबानगर परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत २४ मीटर डीपी रस्त्यावरील सुमारे १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या व बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली. स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन, दळणवळण, नगररचना, विद्युत, अग्निशामक तसेच सुरक्षा बलाच्या जवानांचा यात सहभाग होता.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर अतिक्रमण करू नये. नियोजनबद्ध शहर विकास, सुकर वाहतूक आणि भविष्यातील सुविधा लक्षात घेता अशा कारवायांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.










