- वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सक्षम प्रशासनासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले आहेत.
महापौरांनी सांगितले की, शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता सक्षम व कार्यक्षम प्रशासन अत्यावश्यक आहे. सध्या अनेक विभागांमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने नागरिक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांनी विद्यमान तसेच आगामी रिक्त पदांची माहिती तात्काळ सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय आवश्यक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून भरती प्रक्रिया गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. “रिक्त पदांमुळे नागरिक सेवेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी तातडीने भरती करणे गरजेचे आहे,” असे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.










