- स्थायीचा निर्णय; महामेट्रोसमोर आता रस्ते दुरुस्तीचे आव्हान…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ एप्रिल २०२६) :- निगडी ते पिंपरी दरम्यान महामेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे सेवा रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांची दुरुस्ती केल्याशिवाय मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेकडून निधी मंजूर करण्यात येणार नाही, असा ठाम निर्णय स्थायी समितीने घेतला.
बुधवारी (दि. ८) झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय चर्चेला आला. समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्यांनी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत असल्याने प्रथम सेवा रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सध्या सुमारे ५५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ९६० कोटी १८ लाखांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी महापालिकेचा वाटा १४६ कोटी ९१ लाख रुपये आहे. आतापर्यंत ४९ कोटी रुपये देण्यात आले आहेत, तर पुढील ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव समितीसमोर होता. मात्र, निगडी ते चिंचवडपर्यंतचे सेवा रस्ते दुरुस्त न केल्यास निधी देऊ नये, असा निर्णय घेत समितीने संबंधित प्रस्ताव तहकूब ठेवला आहे.










