- ५० कोटींच्या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कोण?..
- स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत?…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर प्रकार समोर आला असून, सुमारे ५० ते ५२ कोटी रुपयांच्या बिल वितरणाबाबत लेखा विभागावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांना देयके अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
माहितीनुसार, सन २०२६-२७ च्या मंजूर अंदाजपत्रकात संबंधित कामांसाठी तरतूद नसतानाही ७० हून अधिक कामांची बिले काढण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित विभागप्रमुखांना याची माहिती नव्हती. बोगस उपसूचना आणि काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. “हा प्रकार म्हणजे मनपाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरील बैठकीला मुख्य लेखा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे. आयुक्तांकडून सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“उपसूचनांच्या प्रक्रियेत कोणतीही गैरव्यवस्था झालेली नाही. संबंधित सर्व कामांच्या उपसूचना त्या-त्या विभागप्रमुखांकडूनच सादर करण्यात आल्या आहेत. या कामांसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्यामुळे त्यावरील खर्च त्याच आर्थिक वर्षात करणे गरजेचे होते. तसेच या प्रस्तावांवर लोकप्रतिनिधींच्या सुचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना मंजुरी देणे ही नियमित प्रक्रिया होती. याशिवाय, बुधवारी (दि. ८) आयुक्त आणि लेखा विभागाची बैठक असल्याने मी आणि आयुक्त त्या बैठकीस उपस्थित होतो, त्यामुळे त्या दिवशी महापालिकेत उपस्थित राहणे शक्य झाले नाही.” – प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका…










