- प्रवीण जैन सक्तीच्या रजेवर, प्रमोद भोसले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखा विभागात महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सन २०२५-२०२६ च्या सुधारित तसेच सन २०२६-२०२७ च्या मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ-घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ९ एप्रिल २०२६ रोजी समिती गठित करण्यात आली आहे. यासोबतच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांचाही सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य आणि वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबी लक्षात घेता, चौकशी प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पडावी यासाठी प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान कोणताही प्रभाव पडू नये तसेच महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत राहावे यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.










