न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ एप्रिल २०२६) :- शहरात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही, विनापरवाना देशी बनावटीची पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (१२ एप्रिल) रात्री पावणे दहाच्या सुमारास संत तुकारामनगर येथील एच.ए. मैदानावर ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस सह आयुक्तांनी ३० मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार, १ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत शहरात घातक शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही, रविवारी रात्री एच.ए. मैदानाच्या परिसरात काही तरुण संशयास्पद रितीने थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर भुरे आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी देशी बनावटीची २ पिस्तुलं, ०२ जिवंत काडतुसे ,एक यामाहा मोटारसायकल (किंमत १ लाख रुपये),एकूण जप्त किंमत: १,०२,००० रुपये आरोपींच्या झडतीमध्ये पोलिसांना धक्कादायक मुद्देमाल मिळून आला.
दीपक बर्फे (वय २६, रा. पिंपळे गुरव) ,अतुल भालेराव (वय ३१, रा. दापोडी), मुकेश काची (वय २६, रा. दापोडी) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपींकडे ही शस्त्रे कोठून आली आणि त्यांचा काय उद्देश होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.










