न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ एप्रिल २०२६) :-रेड झोनमधील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर असलेले अडथळे अखेर दूर झाले असून, केवळ रेड झोनचा आधार देत दस्त नोंदणी नाकारणे आता शक्य होणार नाही, असे स्पष्ट आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो प्रलंबित मालमत्ता व्यवहारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना अॅड. एस.आर. गोयल यांनी सांगितले की, शहराच्या लगत मोठ्या प्रमाणावर लष्करी मालमत्ता आहेत. या मालमत्तेपासून ठराविक अंतरावरील मिळकतींच्या खरेदी-विक्रीस अनेक ठिकाणी अडथळे निर्माण केले जात होते. दुय्यम निबंधक कार्यालयांकडून रेड झोनचा आधार घेत दस्त नोंदणी टाळली जात होती, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या अन्यायाविरोधात अॅड. गोयल यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला निवेदन दिले तसेच न्यायालयीन निर्णयाची प्रत सादर केली. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या प्रयत्नांनंतर ९ एप्रिल २०२६ रोजी नव्या परिपत्रकाद्वारे महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले.
परिपत्रकानुसार, रेड झोनमध्ये बांधकामावर काही निर्बंध असू शकतात, मात्र खरेदी-विक्री व्यवहारांवर कोणतीही बंदी नाही. त्यामुळे दस्त नोंदणी नाकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे निबंधक कार्यालयांतील मनमानीला आळा बसणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील मालमत्ता व्यवहारांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










