न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ एप्रिल २०२६) :- विनयभंग आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३० वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीने शनिवारी (दि. ११) शाहूनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिचे मार्गदर्शक असलेले बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (वय ५०, रा. धानोरी, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित विद्यार्थिनी बॉटनी विषयात पीएचडीचे शिक्षण घेत होती आणि डॉ. बिन्नियमिन हे तिचे मार्गदर्शक होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपी प्राध्यापकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून तिच्यावर गैरवर्तन आणि मानसिक छळ सुरू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच आत्महत्येच्या दोन दिवस आधी आरोपीने स्टॅम्प पेपरवर माफीपत्र देत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे लिहून दिले होते.
मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला असून ती त्यातून सावरू शकली नाही, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, संशोधन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










