न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि.१६ एप्रिल २०२६) :- उद्याने ही शहराचे वैभव असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम करत असतात. याच पार्श्वभूमीवर थेरगाव प्रभाग क्रमांक २३ येथे साकारण्यात येत असलेल्या निसर्गरम्य ‘बटरफ्लाय गार्डन’च्या कामाची पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता या उद्यानाच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान सभापती अभिषेक बारणे यांनी नागरिकांसाठी हे उद्यान अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त व्हावे या दृष्टीने अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करणे, उद्यानातील झाडांची संख्या वाढवणे आणि परिसरातील ड्रेनेज लाईनची पाहणी करून योग्य नियोजन लावण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक, पार्किंग आणि नियमित स्वच्छतेसाठी ठोस व्यवस्थापन प्रणाली (मेंटेनन्स शेड्युल) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उद्यानामध्ये पक्षांना आकर्षित करणारी स्थानिक फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यावरही त्यांनी भर दिला.
या प्रसंगी उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान निरीक्षक सुनील नाळे, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर, उद्यान विभागाचे अरविंद कदम, उपअभियंता रमेश निवृत्ती जिंतीकर, कनिष्ठ अभियंता विकास दत्तात्रेय गोसावी यांच्यासह माजी स्वीकृत नगरसेवक संदीपजी गाडे व प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच एक हक्काचे विरंगुळा केंद्र उपलब्ध होणार आहे.
”थेरगावचे हे बटरफ्लाय गार्डन शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरेल. नागरिकांना एक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. उद्यानाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याकडे आमचा कटाक्ष राहील.”
— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.)










