न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१६ एप्रिल २०२६) :- प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली येथे प्रबुद्ध विचार मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांना रहिवाशांनी अभिवादन केले.
मॅनहॅटन कम्युनिटी हॉलमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विशाल घोरपडे यांच्या हस्ते झाले. विविध विषयांवरील पुस्तकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लॉँग आयलँड हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे नृत्य, गायन, नाटिका आणि वक्तृत्व स्पर्धा रंगल्या.
अश्विनी कापुरे, राजनंदिनी भागवत, हर्षल कोतले आदी मान्यवरांनी प्रबोधनपर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती भालेराव व जयश्री आराख यांनी केले.
सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. महापौर व नगरसेवकांनी सहभाग घेत महापुरुषांना अभिवादन केले. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.










