- “सर्कस” या बालनाट्याला स्पेशल ज्युरी पुरस्कार…
- बालकलाकारांमध्ये दडलेली कला आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील – अनुप मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- अनूप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत आणि बालगड रंगभूमी निर्मित विविध बालनाट्यांनी राज्यभरात उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. माटुंगा येथे पार पडलेल्या “बालगड रंगभूमी रविकिरण बालनाट्य स्पर्धा”मध्ये सादर करण्यात आलेल्या “सर्कस” या बालनाट्याला स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला, ही संघासाठी अभिमानाची बाब ठरली.
तसेच, “श्री कला संस्कार बालनाट्य स्पर्धा, कल्याण” येथे सादर झालेल्या बालनाट्याने उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. याशिवाय, २३ व्या बाळराज्य नाट्य स्पर्धा, पुणे केंद्रातून ४६ बाल एकांकिकांमधून ४था क्रमांक मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवणे, ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
अनुप मोरे म्हणाले, “बालकलाकारांमध्ये दडलेली कला आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. या यशामुळे मुलांचा उत्साह अधिक वाढेल. पुढील काळातही दर्जेदार बालनाट्य सादर करून राज्यस्तरावर आपली ओळख अधिक भक्कम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या यशात मोलाची भर पडली आहे. “अतुल परचुरे बालकरंडक स्पर्धा”मध्ये (६ ते ९ वयोगट) “सर्कस” या बालनाट्यासाठी प्रथम क्रमांक मिळवण्यात आला, तर १० ते १३ वयोगटात “सदाबहार” या नाटकासाठीही प्रथम क्रमांक पटकावण्यात यश आले.
या सर्व यशामागे अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्राचे मा. प्रदेश अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. दिग्दर्शक व लेखक अमेय शरद गोरे यांनी कलात्मक दृष्टी दिली. नेपथ्यकार आदिती गोसावी व निलीमा कुळकर्णी, तसेच वेशभूषा संयोजन अश्विनी किनीकर व दिपाली जाधव यांनीही उत्कृष्ट योगदान दिले. प्रॉडक्शनची जबाबदारी महेश खपाले पाटील व अनिल यांनी समर्थपणे पार पाडली. या यशाबद्दल संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.










