- ३१ मेपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी नोंदणी करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील वय वर्ष १८ व त्यापुढील दिव्यांग व्यक्तींना हयातीच्या दाखल्यासाठी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी महापालिकेने ‘पीसीएमसी दिव्यांग लाइफ सर्टिफिकेट (PCMC Divyang Life Certificate) हे अँड्रॉईड अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे आता दिव्यांग व्यक्ती हयातीच्या दाखल्याची नोंद घरबसल्या करू शकणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेत १७ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ या काळात हयातीच्या दाखल्यासाठी नोंद करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून देण्यात येणारे आर्थिक लाभ घेण्यासाठी हयातीच्या दाखल्याची संगणकीय पद्धतीने नोंद करणे बंधनकारक असून, संबंधित नोंद न केल्यास मिळणारा आर्थिक लाभ स्थगित करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या दिव्यांग कक्षाच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने महापालिका हद्दीतील वय वर्ष १८ व त्यापुढील दिव्यांग व्यक्तींच्या हयातीच्या दाखल्याची नोंद आता संगणकीय पद्धतीने अँड्रॉईड अॅपद्वारे करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे हयातीच्या दाखल्याची नोंद करण्यासाठी ३१ मे २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे अनिवार्य आहे. दाखल्यासाठी नोंद करताना मदत आवश्यक असल्यास संबंधित लाभार्थ्यांनी महापालिकेच्या जवळील क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.









