- व्हीआयपी कक्षात विनापरवाना कौटुंबिक कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील गैरवापर प्रकरणात प्रशासनाने कारवाई करत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर दंड ठोठावला आहे. प्रेक्षागृहाच्या व्हीआयपी कक्षाचा वैयक्तिक कार्यक्रमासाठी वापर केल्याचे प्रकरण चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात प्रेक्षागृहाचे माजी व्यवस्थापक प्रमोद श्रीकृष्ण सावरकर यांनी आपल्या पदाचा वापर करून कुटुंबीयांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याची तक्रार समोर आली होती. या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली असता आरोपांना पुष्टी मिळाली. त्यानंतर क्रीडा विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला दिलेल्या उत्तरात त्यांनी प्रेक्षागृहातील व्हीआयपी कक्षाचा वापर इतरांसाठीही होत असल्याचा उल्लेख केला; मात्र तो खुलासा ग्राह्य धरला गेला नाही.
दरम्यान, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्याने अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट करत २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड त्यांच्या निवृत्तीवेतनातून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे महापालिकेच्या मालमत्तेचा वैयक्तिक वापर केल्यास कठोर भूमिका घेतली जाईल, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.










