न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी प्रक्रियेलाच विलंब होत असल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर बोगस उपसूचनांच्या आधारे मोठ्या प्रमाणात निधी वितरित केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात काही लोकप्रतिनिधी व ठेकेदारांचाही सहभाग असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे.
या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीला अल्पावधीत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र निश्चित मुदत उलटल्यानंतरही अहवाल सादर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, चौकशी सुरू असतानाच समितीच्या नेतृत्वात अचानक बदल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे. परिणामी, नव्या अध्यक्षांना संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागणार असून चौकशी आणखी लांबण्याची शक्यता आहे.
महापालिका अधिनियमातील आर्थिक शिस्त आणि मंजुरी प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे आरोप गंभीर स्वरूपाचे असताना, अहवालातील विलंबामुळे पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चौकशीचा निष्कर्ष केव्हा आणि कसा समोर येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










